भंडारा शहरात हेल्मेट जनजागृती रॅली उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा यांच्या वतीने मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी शहरात भव्य हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘रस्ता सुरक्षा – जीवन रक्षा’ हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेल्या या रॅलीत दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. ही रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख चौक व बाजारपेठांमधून मार्गस्थ झाली. गजबजलेल्या परिसरातून जात असताना नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत रस्ता सुरक्षेचा संदेश आत्मसात केला.

रॅलीचे नेतृत्व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सतीश जाधव व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्ष्- ाक जितेंद्र बोरकर यांनी केले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक वैभव गुल्हाणे, सुहास ठोंबरे, शेखर आचार्य, तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ, अनिल ढोले, गुलशनकुमार चौरे व श्रीमती मेघाराणी काशिद यांच्यासह परिवहन कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच ३६ भंडारा रायडर्स क्लबचे सदस्य, ट्रॅफिक पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीदरम्यान ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे प्रबोधन करण्यात आले.

‘दुचाकी चालविताना हेल्मेट, चारचाकी चालविताना सीटबेल्ट वापरा, वेगावर नियंत्रण ठेवा व टऌ मोबाईलचा वापर टाळा. एका क्षणाची बेफिकिरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते,’ असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. हे हेल्मेट ए. के. गांधी टिव्हीएस भंडारा यांच्याकडून प्रायोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिनाभर विविध उपक्रम राबवून रस्ते अपघात शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. ‘आवरा वेगाला, सावरा जीवाला’ हा मोलाचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण भंडारा शहरात पोहोचवण्यात आला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *