
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली – शहरातील सेंदूरवाफा परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेंदूरवाफा साकोली प्रभाग क्रमांक १ व २ अंतर्गत येणाºया बिरसा मुंडा चौक, गजानन बाबा मंदिर मागील लोकवस्ती, तसेच पॉलिटेक्निक कॉलेज समोरील परिसरात बिबट्या आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास अनेक नागरिकांनी बिबट्याला वस्तीत मुक्त संचार करताना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, विशेषत: लहान मुलांच्या व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत शिवसेनेचे तालुकाप्रमुख राधेश्याम मुंगमोडे यांनी नागरिकांना सोबत घेऊन बुधवारी (दि. १४ जानेवारी) साकोली वनविभागाला निवेदन सादर केले. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे (साकोली) यांची भेट घेऊन बिबट्याला तातडीने जेरबंद करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. याचबरोबर, रात्रीच्या वेळी वाढणाºया धोक्याचा विचार करता साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांचीही भेट घेऊन परिसरातील बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीची तत्काळ दखल घेत मुख्याधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांची चमू त्या परिसरात पाठवून प्रत्यक्ष पाहणी केली.

बिबट्याचा वावर व बंद पथदिवे असलेल्या भागात झालेल्या पाहणीवेळी शिवसेना तालुकाप्रमुख राधेश्यामजी मुंगमोडे, नगरसेवक पुष्कर करंजेकर, रोहित टेंभरे (युवासेना तालुका उपप्रमुख), विवेक काशीवार (युवासेना शहरप्रमुख), प्रज्वल गभणे, नंदकिशोर पटले, निशांत कुडेगावे, उमाकांत मंदुरकर, सतीश शेंडे, सुमित धुर्वे यांच्यासह असंख्य शिवसैनिक, परिसरातील नागरिक तसेच नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे, प्रकाश व्यवस्था सुरळीत करणे व सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. वनविभाग व नगरपरिषद यांनी त्वरित कारवाई न केल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.