
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहरातील नागरिकांच्या नागरी समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे आणि प्रशासन थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचावे, या उदात्त उद्देशाने तुमसर नगर परिषदेचे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी सुरू केलेली “नगराध्यक्ष आपल्या दारी” ही अभिनव मोहीम सध्या संपूर्ण शहरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील अंतर मिटवून थेट संवाद साधणारा हा उपक्रम प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारा ठरत आहे.
केवळ तक्रार नोंद नाही, तर थेट जागेवरच अॅक्शन!
नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इंजि. सागर गभने यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता, शहरातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नागरिकांकडून प्राप्त होणाºया तक्रारींची केवळ कागदोपत्री नोंद घेतली जात नाही; तर नगराध्यक्ष स्वत: संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचाºयांना सोबत घेऊन थेट घटनास्थळी धाव घेतात. समस्येच्या गांभीर्यानुसार जागेवरच आवश्यक ते निर्देश देऊन कामाचा निपटारा केला जात असल्याने, वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता मोठी गती मिळाली आहे.
महिन्याभरात नागरी समस्यांचा धडाका; ‘या’ कामांना प्राधान्य
गेल्या अवघ्या महिनाभरात या मोहिमेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांमधील अनेक गंभीर प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, कचरा व्यवस्थापन, व रस्ते दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी खराब आणि खड्डेमय रस्त्यांच्या तात्पुरत्या व तातडीच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले.
‘आॅन द स्पॉट’ निर्णय; ‘नो’ कागदी घोडे!
आतापर्यंतचा इतिहास असा की, एखादी नाली तुंबली किंवा पाणी आले नाही तर अर्ज करा, मग तो फाईलमध्ये जाईल, मग मंजुरी मिळेल… यातच महिन्यांचा काळ निघून जायचा. पण इंजि. सागर गभने यांनी हा ‘टेबलटेबल’चा खेळच संपवला आहे. या मोहिमेत फक्त तक्रार लिहून घेतली जात नाही, तर नगराध्यक्ष स्वत: गाडीतून उतरतात, सोबत इंजिनिअर्स आणि सफाई कर्मचाºयांचा फौजफाटा असतो. समस्येच्या जागेवर उभे राहूनच ‘आॅन द स्पॉट’ आदेश सुटतात आणि काम सुरू होते. यामुळे प्रशासनाचा दप्तर दिरंगाई प्रकाराला मोडीत काढला आहे. इंजि. सागर गभने यांचा हा ‘तुमसर पॅटर्न’ केवळ एका शहरापुरता मर्यादित न राहता, राज्यातील इतर नगरपालिकांसाठीही मार्गदर्शक ठरावा असाच आहे. जेव्हा नेतृत्व वातानुकूलित केबिन सोडून उन्हातान्हात जनतेच्या सोबतीने रस्त्यावर उतरते, तेव्हा शहराचा विकास बुलेट ट्रेनच्या गतीने होतो, हेच या मोहिमेने दाखवून दिले आहे.