
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली/अंबाडी : १२० दिवसांत ‘कस्तुर- ी’चा सुगंध देणारे धान म्हणून प्रसिद्ध असलेल्या यशोदा सीड कंपनीच्या बियाण्याची दीड एकर क्षेत्रात डेमोच्या नावाखाली लागवड करण्यात आली. मात्र, चार महिने उलटूनही पिकात ओंब्याचा मागमूसही नसल्याने शेतकºयाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सिल्ली येथील शेतकरी विलास पिसाराम चोपकर यांनी २८ जानेवारी २०२६ रोजी पेरणी केली आणि २० मार्च २०२६ रोजी रोवणी केली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च झाला. परंतु अपेक्षेप्रमाणे धानाचे उत्पादन न होता केवळ हिरवेगार झाडेच दिसत आहेत. डेमोच्या नावाखाली दिलेल्या या बियाण्यामुळे चोपकर यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, आता खरीप हंगाम जवळ आला असतानाही नवीन पेरणी करणे शक्य नसल्याने ते दुहेरी अडचणीत सापडले आहेत. शेतकºयांनी संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली असून, प्रशासनानेही या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
जबाबदारी कोणी घ्यायची?
भंडारा शहरातील नावाजलेले वैभव कृषी केंद्र आणि त्यांचे एजंट काळे व मांढरे यांनी यशोदा सीड कंपनीचे ‘कस्तुरी’ बियाणे प्रायोगिक तत्वावर दिले. १० किलोच्या ५ बॅगा घेऊन चोपकर यांनी दीड एकरात लागवड केली. मात्र १२० दिवसां चा कालावधी संपूनही धानाला ओंब्या लागल्या नाहीत. विलास चोपकर यांनी जाब विचारायला वैभव कृषी केंद्र गाठले. तिथे ‘आम्ही काय करू शकत नाही’ असे उडवाउडवीचे उत्तर मिळाले आणि कृषी केंद्राने हात झटकले.
कंपनी मुकी, कृषी केंद्र बहिरे
एखाद्या कंपनीचे बियाणे शेतकºयांना देण्यापूर्वी कृषी केंद्रांनी त्याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. पण बहुतांश कृषी केंद्र संचालकांचे कंपन्याशी साटेलोटे असते. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात बियाण्याचे बेकायदेशीर प्रयोग राबविणे नित्याचेच झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहे. चोपकर यांनी यशोदा सीड कंपनी, हिंगणघाटला वारंवार फोन लावले. पण कंपनीने एकदाही फोन उचलला नाही. बियाणे विकताना मोठ्या बढाया मारायच्या आणि पीक आले नाही की तोंड लपवायचे, हा कंपन्यांचा नवा फंडा झाला आहे.
कागदी घोडे नाचवण्याची वेळ
फसवणूक झाल्याने चोपकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी, यशोदा सीड कंपनी व कृषी सभापती जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. वैभव कृषी केंद्र व यशोदा बियाणे कंपनीवर फौजदारी कारवाई करून लागवडीचा ४० हजार खर्च व हंगाम नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे.
दुहेरी फटका, तिहेरी प्रश्न
नांगरणी, मजुरी, खते, पाणी याचा ४० हजार रुपये खर्च पूर्ण वाया गेला. उन्हाळी हंगामाचे उत्पन्न बुडाले. कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावला गेला. खरीप हंगाम आला तरी शेतात उभे पीक आहे. त्यामुळे नवीन पेरणी लांबणीवर पडली. दुबार पेरणीचे संकट ओढवले.