
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: महसूल मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत लगतच्या किटाडी- तिरखुरी मार्गावरील एका राइस मिलच्या बाजूच्या शेतशिवारात सोमवारी अवैधरीत्या मुरुमाचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळताच स्थानिक किटाडी येथील ग्राम महसूल अधिकारी यांनी उत्खनन केलेल्या ठिकाणी पंचनामा करून तहसील प्रशासनाला सादर केला आहे. किटाडी-तिरखुरी मार्गावर एका राईस मिल लगत असलेल्या गट क्र.३९७ ही राजेश वंजारी यांच्या खासगी मालकीची शेतजमीन आहे.
येथेच जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाºयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.खोदकाम केलेल्या ठिकाणचा पंचनामा करून लगतच शेतमालकाला विचारपूस केली.यात मोठया प्रमाणात खोदकाम केले असल्याचे निष्पन्न झाले.शिवाय शेकडो ब्रास मुरुमाचे खोदकाम करून सदर मुरुमाची वाहतूक केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे किटाडी गावात माती,मुरूम चोरीचेही प्रस्थ वाढत असल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे.शेतीचे उत्खनन करण्याच्या नाव-ावर माती-मुरूमाची बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे.
राजरोसपणे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो.हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाचकायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे,याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही.विटभट्ट्यांकरिता लागणाºया मातीची कमी ब्रासचा दंड भरून जास्त ब्रास माती उत्खनन करणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाच्या महसूलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टी धारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन याची चौकशी करून कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.