चिखला खाणीत वृक्षारोपणाच्या नावाखाली मोठा घोटाळा?

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : चिखला खाण परिस- रात पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरव्यवहाराचा मोठा पदार्फाश समोर आला आहे. अनेक वर्षांपासून एमओआयएल कंपनीकडून कागदोपत्री हजारो झाडे लावल्याचे दावे करण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत हे दावे फोल ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी १९ मे २०२६ रोजी चिखला खाण परिसराला भेट देत वृक्षारोपणाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत कंपनीच्या दाव्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि धक्कादायक परिस्थिती उघड झाली. एमओआयएलच्या नोंदीनुसार, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि हरित पट्टा विकसित करण्यासाठी परिसरात दोन ते तीन हजार झाडे लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष ठिकाणी केवळ २१३ रोपे आढळली आणि तीही पूर्णपणे सुकलेली, निर्जीव व मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक नागरिकांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवून सरकारी यंत्रणा आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

खासदारांच्या उपस्थितीतच कंपनीच्या दाव्यांची पोलखोल झाल्यानेएमओआयएल व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘जर हजारो झाडे लावली असतील, तर ती नेमकी कुठे आहेत?’ असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एमओआयएल एजंट उमाकांत भुजाडे यांनी सांगितले की, खासदारांनी केवळ एका ठिकाणची पाहणी केली आहे. वृक्षारोपणाचे काम विविध ठिकाणी करण्यात आले असून, ज्या कंत्राटदाराला झाडे लावण्याचे काम देण्यात आले आहे, त्याने सुकलेल्या झाडांची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीही, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पर्यावरण आणि विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना, प्रत्यक्षात जमिनीवर काहीच परिणाम दिसत नसल्याने या प्रकरणाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. चिखला खाणीत वृक्षारोपणाच्या नावाखाली झालेला हा कथित घोटाळा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *