नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगराध्यक्षांचा पुढाकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या सौंदर्यीकरणातून नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेल्या चौपाटी परिसरात मागील काही दिवसांपासून असामाजिक तत्त्वांकडून कचरा फेकणे, मादक पदार्थांचे सेवन करणे व दारूच्या बाटल्या टाकणे अशा अनैतिक कृत्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

या गंभीर बाबीची दखल घेत नवनिर्वाचित नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या चमुंसह चौपाटी परिसरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील अस्वच्छता व अनुचित प्रकारांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पाहणीवेळी उपाध्यक्ष रोहिणी मुंगुलमारे, नगरसेविका मीना लांजेवार, रेणु गणवीर, मेघा बडवाईक, प्रशासकीय अधिकारी कल्याणी भवरे, मिलिंद गजापुरे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

चौपाटी परिसरात होत असलेल्या गैरप्रकारांवर तातडीने आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी दिले. तसेच नियमित स्वच्छता, रात्रीच्या वेळी देखरेख व अनुचित प्रकार करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने तलाव चौपाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून असामाजिक तत्त्वांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच तलावाचे खोलीकरण करून भविष्यात बोटींग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी दिल्या.

या माध्यमातून तलावाचा पर्यटन व विरंगुळ्याच्या दृष्टीने अधिक विकास करण्याचा नगरपरिषदेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर चौपाटी परिसर शहरातील वयोवृद्ध नागरिकांना सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी तसेच युवकांना जॉगिंगसाठी निसर्गरम्य व आरोग्यदायी वातावरण देणारा आहे. हा परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुंदर ठेवणे ही केवळ नगरपरिषदेचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे आवाहन नगराध्यक्षा देवश्री कापगते यांनी केले. आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे आणि शहरातील निसर्गरम्य ठिकाणांचे जतन करणे ही प्रत्येक शहरवासीची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी त्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *