
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अड्याळ : भरधाव वेगाने येणाºया एका अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा दुदैर्वी अपघात पालोरा-कोंढा महामार्गावरील पालोरा चौरास येथे मंगळवारी, (दि.१४) रोजी सकाळी ६.३० ते ७ वाजेच्या सुमारास घडला. या घटनेमुळे पिंपळगाव निपानी आणि बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांची नावे आणि घटनेचा तपशील या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे धनंजय गजानन भानारकर ( ३८, रा. पिंपळगाव निपानी) आणि राजेश चेपा गजभिये (४५, रा. बोरगाव/खांबाडी) अशी आहेत. तर सचिन नारायण गाडेकर (वय ३०, रा. पिंपळगाव निपानी) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय भानारकर हे त्यांचे मित्र सचिन गाडेकर आणि राजेश गजभिये यांच्यासह दुचाकी क्रमांक (एम.एच.३१बी.वाय.९९२३) ने पवनीकडे जात होते. पालोरा चौरास जवळ पोहोचले असता, मागून येणाºया एका अज्ञात वाहनाच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीला मागून भीषण धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की, धनंजय आणि राजेश हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि जागीच गतप्राण झाले. पोलिस यंत्रणा कामाला; अज्ञात वाहनाचा शोध सुरू घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालय, अड्याळ येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमी सचिन गाडेकर याला त्वरित वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले. ठाणेदार धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.
दोन गावांवर दु:खाचा डोंगर धनंजय आणि राजेश यांच्या निधनामुळे पिंपळगाव निपानी आणि बोरगाव या दोन्ही गावांत मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पहाटेच्या वेळी कामासाठी निघालेल्या या तरुणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात संताप आणि दु:ख व्यक्त केले जात आहे. भरधाव वाहनांमुळे महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.