
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : दलित, शोषित आणि वंचितांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरणाºया आणि संविधानाद्वारे आत्मभान देणाºया क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच ठिकठिकाणी अभिवादन सभा, बाईक रॅली आणि शोभायात्रांच्या माध्यमातून भीमजयंतीचा सोहळा भव्य स्वरूपात साजरा झाला. शहरातील प्रत्येक वस्ती आणि कानाकोपरा महामानवाच्या जयंतीच्या जल्लोषात न्हाऊन निघाला होता. रस्त्यावरून जयभीमचा जयघोष करीत निळ्या पताकांसह फिरणारे अनुयायी शहराचे मुख्य आकर्षण ठरले. घरांची दारे, वस्त्यांचे प्रवेशद्वार आणि रस्ते तोरणे, पताका, पंचशील ध्वज तसेच निळ्या कमानींनी सजले होते.
जयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच शहरात मोठा उत्साह दिसून येत होता. अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बुद्धविहार आणि स्मारकांकडे धाव घेतली. सकाळच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने स्मारक परिसरात बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी समिती अध्यक्ष आणि बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैशालीनगर, नाशिकनगर, डॉ. आंबेडकर वॉर्ड, गौतमबुद्ध वॉर्ड, रमबाई वॉर्ड, समता नगर परिसरात दिवसभर भीमगीतांचा स्वर गुंजत होता. समता सैनिक दलाच्या सैनिकांनी शिस्तबद्ध संचलनकरून महामानवाला मानवंदना दिली. ठिकठिकाणी सामूहिक भोजन, भीमपहाट आणि मिठाई वाटपाचेकार्यक्रम पार पडले.
विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी जयंतीच्या पूर्वरात्री १२ वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीने आसमंत उजळून निघाला. अनुयायांनी चौकाचौकात एकत्र येत केक कापून जन्मोत्सव साजरा केला. गांधी चौक परिसरात सायंकाळी लेझर शो आणि भीम गीतांच्या सुरावटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने झळाळून निघाले होते. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले. त्रिमूर्ती चौकातील भव्य पुतळ्याला राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.