
पळसपाणी जवळील धोकादायक वळणावर मोटारसायकल झाडावर आदळली ; कुणाल गोटेफोडे व महेश टांगसेलवार यांच्या निधनाने परिसरात हळहळ
साकोली :स्थानिक करंजेकर पॉलिटेक्निक कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे साकोलीसह सौंदड व लाखांदूर तालुक्यातील चिकना/तावशी येथे शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करंजेकर पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी १) कुणाल मनोहर गोटेफोडे (वय २१, रा. सौंदड) व २) महेश यशवंत टांगसेलवार (वय २२, रा. चिकना/तावशी, ता. लाखांदूर) हे कॉलेजतर्फे आयोजित इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी मौजा पालोरा येथे गेले होते. व्हिजिट आटोपून मोटरसायकल क्रमांक MH 36 AN 5493 ने परत येत असताना पळसपाणी गावाजवळील धोकादायक वळणावर त्यांच्या मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळले.
अपघात इतका भीषण होता की दोन्ही विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू साळवे करीत आहेत.
अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या दोन तरुण विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाविद्यालयीन मित्रमंडळी, शिक्षक व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पळसपाणी परिसरातील वळणांवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.