■ साणगडीच्या पीएमश्री विद्यालयातील शिक्षण व्यवस्था कोलमडली
■ विज्ञान-कला शाखेतील आठ विषय शिक्षकांची पदे रिक्त
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
साकोली : गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दावा केला जात असतानाच साणगडी येथील पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्था शिक्षकांच्या कमतरतेमुळे अडचणीत आली आहे. विज्ञान शाखेतील जीवशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, तर कला शाखेतील इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या आठ प्रमुख विषयांसाठी नियमित शिक्षक उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे, रिक्त पदांमुळे निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी कार्यरत असलेले १२ घड्याळी तासिका शिक्षकांनाही २५ सप्टेंबरपासून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे ११२७ विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून, परिसरातील १५ गावांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य चिंतित आहे.
विद्यालयातील शिक्षकांचे काही रिक्त पदे २०१२ पासून प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालयासाठी आठ आणि इयत्ता पाचवी ते सातवीसाठी पाच, अशा एकूण १३ शिक्षकांची आवश्यकता असताना पर्यायी व्यवस्थाही बंद झाल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. घड्याळी तासिका शिक्षकांच्या नियुक्तीतील नियम पालनासंदर्भात निर्माण झालेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रशासनाच्या प्रक्रियात्मक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना का बसावा, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षकांची नियुक्ती व रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा पालकांचा आरोप आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्यापूर्वी तातडीने आठ विषय शिक्षक उपलब्ध करावेत, तसेच कायमस्वरूपी पदभरती होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही देण्यात येत आहे.