
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील मानेगाव /सडक येथे भूमिगत रस्त्याचे बांधकाम सुरु असून लाखनी कडून साकोली कडे जाणारा मार्ग पूर्णपणे खोदून वाहतूक सुरु केली आहे. तसेच सुरु असलेल्या रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरु असल्याने लाखनी झ्रसाकोली, साकोली भंडारा वाहतूक एकाच रस्त्याने होत असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच या परिसरात धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर सुरक्षिततेचा उपाय म्हणून कोणतीही उपाययोजना केली नाही. तर खोदकाम केल्याने परिसरात धुळीनचे वातावरण तयार झाले असून अनेकांना या धुळीमुळे श्वसनाचे आजार झाल्याचे नागरिकांत चर्चा आहे.
खोदकामावरून वाहतूक सुरु असल्याने त्यावर पाणी टाकण्यात येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. तालुका प्रशासनाने या बाबत सीमा बांधकाम कंपनीला टँकरद्वारे पाणी देण्याचे निर्देश दिले असले तरीही बांधकाम कंपनीने ५ टँकरद्वारे पाणी टाकत असल्याची माहिती दिली मात्र प्रत्यक्षात एकही टँकरद्वारे पाणी टाकत नसल्याने बांधकाम कंपनीने तालुका प्रशसानच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यामुळे जनतेच्या आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेक करणाºया कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नागरिकां कडून होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३(जुना ६) लाखनी शहराच्या मध्य भागातून जातो. उड्डाण पूल संपल्याबरोबर वाहतूक वळविण्यात आली आहे. ह्या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे सुसाट वेगाने वाहने धावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या वरून दररोज हजारो वाहने मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे अपघाताचे मोठे प्रमाण वाढले आहे.
अपघात होऊन काहींना आपले जीव गमवावा लागले तर काहींना कायमचेअपंगत्व आले आहे. वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवित आहेत. तसेच सिमा कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारे मानेगाव येथे केवळ एकच सुरक्षा रक्षक नेमला असून तो हि अकुशल आहे. त्यामुळे जणू अपघात करण्यासाठी तर कन्स्ट्रक्शन कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवले काय ? असा प्रश्न नागरिक करीत असले तरी सदर कंपनीला रस्ता बांधकामाचे कंत्राट दिले की, अपघात घडविण्याचे काम दिले? याची चर्चा होत असून याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने सबंधित कंपनीला योग्य ती समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. एखाद्या वाहनात तांत्रिक बिघाड आल्यास पर्यायी रस्ता नसल्याने ५ किमी अंतर कापण्यासाठी साधारणत: २० ते ३० मिनिटांचा वेळ लागत आहे. तसेच मानेगाव जवळील रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तसेच रस्त्यावर भलेमोठे गतिरोधक लावले असल्याने दररोज अपघात होत आहेत. या अपघातांच्या नोंदी पोलिसात होत नसल्यातरी अनेकांना आपले जीव धोक्यात घेवून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.