तुमसर बाजार समितीच्या बैठकीवर हमाल माथाडी कृती समितीचा ‘बहिष्कार’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथील हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी प्रशासनाने कामगारांविरुद्धच पोलिसांत धाव घेतल्याने वातावरण तापले आहे. प्रशासनाच्या या ‘दडपशाही’ धोरणाचा निषेध म्हणून हमाल माथाडी कामगार कृती समितीने १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त बैठकीवर जाहीर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात समितीचे समन्वयक वैभव चोपकार व सहसमन्वयक चंद्रशेखर सेलोकर यांनी प्रशासनाला निवार्णीचा इशारा दिला असून, कामगारांच्या हक्कासाठी आता कायदेशीर लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल, मापारी आणि टोपलेवाले कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीने गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता.

यावर सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित असताना, बाजार समिती प्रशासनाने कामगारांच्या निवेदनांना ‘गुन्हेगारी’ स्वरूप देत चक्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रशासनाच्या या कृतीमुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाजार समितीने १० एप्रिल रोजी पत्र निर्गमित करून १७ एप्रिल (शुक्रवार) रोजी सकाळी ११ वाजता संयुक्त सभेचे आयोजन केले होते. मात्र, एका बाजूला चर्चेचे निमंत्रण द्यायचे आणि दुसºया बाजूला कामगार प्रतिनिधींवर पोलीस कारवाईची मागणी करायची, हा प्रशासनाचा दुटप्पी चेहरा असल्याचे कृती समितीने म्हटले आहे. जोपर्यंत कामगारांविरुद्धची पोलीस तक्रार मागेघेतली जात नाही आणि आदराची वागणूक मिळत नाही, तोपर्यंत अशा कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे वैभव चोपकार यांनी बाजार समितीला दिलेल्या निवेदनातून कळवले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी (भंडारा), उपनिबंधक (सहकारी संस्था) आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आली आहे. बाजार समिती प्रशासनाने आपली भूमिका न बदलल्यास आगामी काळात बाजार समितीच्या कामकाजावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या वादावर वरिष्ठ पातळीवरून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *