
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र सानगडी (पश्चिम) अंतर्गत झाडगाव बिट येथे पाण्याच्या शोधात भटकत असताना एका मादी चितळाचा शेतातील विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. सदर विहीर ही मनोहर बकाराम निमजे यांच्या मालकीच्या शेतात असून परिसरातील अनेक विहिरींना सुरक्षित तोंड नसल्याने त्या जमिनीशी सपाट आहेत. त्यामुळे वन्यजीवांसह मनुष्य जीवितालाही गंभीर धोका निर्माण होत असल्याचे चित्र आहे. घटनेची माहिती मिळताच सानगडी वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
वनपरीक्षेत्राधिकारी सचिन कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक असलम शेख (सानगडी), शिवणकर (उमरी), वनरक्षक रेखा काटंगे, तुरकर, खंडागळे तसेच एन एन आर आर टी चमू व वनसेवक पुरुषोत्तम पुसामे, नितेश हत्तीमारे, नरेश खंडाईत, घनश्याम कंगाले, विष्णू खेडकर, इब्राहिम पठाण यांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. पथकाने अत्यंत शिताफीने व कौशल्याने रेस्क्यू आॅपरेशन राबवत मादी चितळाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. प्राथमिक तपासणीत चितळ पूर्णपणे सुरक्षित व जखमी नसल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले, यामुळे वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील उघड्या व संरक्षक उपाययोजनांविना असलेल्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा विहिरींना सुरक्षित तोंड देणे, जाळ्या बसवणे किंवा संरक्षक भिंती उभारणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत असून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.