
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : नागरिकांच्या महसूल विषयक समस्या एकाच छताखाली सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येत आहे. याअभियानाचा पहिला टप्पा लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथे शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक जिल्हा परिषद शाळेत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिराच्या नियोजनासाठी आज, ५ मार्च रोजी तहसील कार्यालय लाखांदूर येथे आढावा बैठक संपन्न झाली. भंडारा येथील उपजिल्हाधिकारी तथा नियंत्रण अधिकारी श्री. लोंढे यांनी या बैठकीत उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना संबोधित केले. शिबिराची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत याचा लाभ पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तहसीलदार वैभव पवार यांनी शिबिराच्या स्वरूपाबद्दल सविस्तर माहिती दिली. या शिबिरात नागरिकांना खालील सेवा तातडीने पुरवल्या जाणार असून, उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे, प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताºयांचे वाटप, ई-मोजणी अर्ज, अॅग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे आणि विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप, अकृषिक (ठअ) परवानगी मार्गदर्शन, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती आणि गाव दप्तर अद्यावत करणे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार डी. के. धकाते आणि अनिल पवार विशेष परिश्रम घेत आहेत. लाखांदूर तालुक्यातील विशेषत: विरली बु. मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या महसूल विषयक तक्रारींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.