
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : राज्यातील १८ हजार सरकारी शाळा बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट राज्य सरकारने घातला असल्याचा आरोप करत आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने रविवारी जनता दरबारासाठी तुमसर दौºयावर असताना पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. तुमसर येथील जुना बस स्थानक परिसरात आंदोलकांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. महसूल कार्यालयातील नियोजित जनता दरबारासाठी जात असलेल्या पालकमंत्री मंत्री डॉ. पंकज भोयर यांचा ताफा अडवण्यासाठी एआयएसएफचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. सरकारी शिक्षणाचे खाजगीकरण करून सरकारी शाळा बंद पाडणाºया धोरणाचा निषेध केला. जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक शहरात असतानाहीआंदोलकांच्या या हालचालींची पूर्वकल्पना यंत्रणेला कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.