
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : आमंत्रण लॉन ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम करताना निघालेली माती व खडी रस्त्याच्या बाजूला पसरवली जात आहे. या आर्या कन्ट्रक्शनच्या संथ कामामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवासी हैराण झाले आहेत. तुमसर शहरातून खापा गावाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या दोन किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने होत आहे. टप्प्याटप्प्याने एकएका भागाचे काम पूर्ण करणे आवश्यक असताना ठेकेदाराने प्रत्यक्षात वेगवेगळ्या भागांत पोटठेकेदार नेमल्याचे समजते. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे रस्त्यालगत माती व खडी जमा झाली आहे.
या रस्त्यावरून हायवा, एसटी, मोटारी जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, शालेय विद्यार्थी व नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत असून अपघात घडत आहेत. रस्त्याचे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित आर्या कन्ट्रक्शनचे ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवासी, शालेय विद्यार्थी व नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खडी दिसत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. रस्त्याची बारीक खडी अजूबाजूला पसरल्याने वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्याकडेला दुतर्फा ठिकाणी रस्ता खोदल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.