
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात सादर करण्यात आलेल्या एका शासकीय अहवालात ‘बाळासाहेबांचा भंडारा जिल्ह्यात प्रभाव नसल्याचा’ अजब निष्कर्ष काढण्यात आल्याने शिवसैनिकांसह स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि संस्थेला बाळासाहेबांचे नाव द्यावे, अशी मागणी स्वराज्य युवा एकता फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे रविवारी तुमसर येथील जिल्हास्तरीय जनता दरबारात निवेदनाद्वारे केली आहे. कौशल्य विकास विभागाच्या धोरणानुसार राज्यातील अनेक आयटीआय संस्थांना थोर महापुरुषांची नावे दिली जात आहेत. याच धर्तीवर तुमसर आयटीआयला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संस्थेच्या एका पत्राचा(संदर्भ: २८/०५/२०२५) हवाला देत असे सांगण्यात आले की, ‘राज्यस्तरीय गॅझेटियरनुसार भंडारा जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव असल्याचे नोंदीत नाही.’ हा अहवाल अत्यंत अपमानजनक असल्याचे अमित मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि जिल्हाधिकारी सावन कुमार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता यावर शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.