
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील जीवनदायिनी समजली जाणारी चुलबंध नदीची भूगाव, मिरेगाव, सोनमाळा, महेर्गाव, नरव्ह पळसगाव येथील रेतीघाटांचा अद्याप लिलाव झाला नसला तरीही रेती तस्करी जोमात दिवसाढवळ्या व रात्रीच्या सुमारास विना क्रमांकाच्या ट्रक्टरद्वारे सुरु आहे. तर लाखनी शहर व परिसरात दररोज ३० ते ३५ टिप्पर रेती पवनी, मोहाडी व तुमसर परिसरातून येत असून कार्यवाही मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या तस्करीला महसूल विभागाची मुकसंमती असल्याची नागरिकांत चर्चा आहे.
या रेती घाटावरून दररोज अवैधरित्या रेती भरून बांधकाम करणाºया कंपन्यांना आणि घरबांधणी करणाºयांना पुरवठा केला जात असल्याची गोपनीय माहिती समोर आली आहे. तर लाखनी शहर वपरिसरातील काही तस्करांनी आपल्या घराजवळ हि रेती साठवून ठेवून ७ ते ८ हजार प्रतीट्रक्टर या दराने रेतीची विक्री होत असून या अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी नेमलेले पथक मात्र ‘तेरा भी भला, मेरा भी भला’ या पद्धतीने वागत असल्याने तस्करी रोखण्याऐवजी ती अधिक वाढत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. हिवाळी अधिवेशन सुरूअसताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेती मोफत देण्याची मागणी अधिवेशनात केली असली तरी त्यावर वरिष्ठांकडून मूठमाती देण्यात आल्याची चर्चा आहे.
नैसर्गिक रित्या उत्पन्न होणाºया रेतीलाच अभय दिल्या जात असल्यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. टिप्पर चालक ‘आमचे काही बिघडत नाही’ या भावनेने दिवसाढवळ्या रेती तस्करी करत असून कोट्यवधींचा महसूल बुडवत आहेत. या प्रकरणाची महसूल विभागाला माहिती असूनही कारवाही होत नसल्याने माशी कुठेतरी शिंकत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे प्रभारी उपविभागीय अधिकारी हे रात्रीच्या गस्तीत अवैध रेती तस्करी करणारे ट्रक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करीत आहेत. मात्र फिरते पथक कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे.