
लाखांदूर : लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी भर दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. शहरातील अवघ्या पाच वर्षीय मुलीवर एका १५ वर्षीय परप्रांतीयाकडून अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी व तिचे कुटुंबीय सध्या दहशतीत असून आरोपीकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने १५ डिसेंबर रोजी ‘लाखांदूर बंद’ ची हाक देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुना बसस्टॉप गांधी चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत सदर पीडित बलिकेच्या न्याय मिळावे यासाठी शेकडो च्या संख्येने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळीशेकडो महिला पुरुष सर्व जातीधमार्चे लोक एकवटून तहसिल कार्यालयावर धडकले. व महाराष्ट्राचे राज्यपाल यांना तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ लाखांदूर तालुक्यातून हद्दपार करण्यात यावे, आरोपीने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी, तसेच पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याला जामीन मिळू नये, यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा ठोठावावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली. यासोबतच आरोपीच्या कुटुंबाकडे असलेले कथित बेकायदेशीर आधार कार्ड, रेशन कार्ड व रहिवासी दाखले तात्काळ रद्द करून ते तयार करून देणाºयांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.