
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील मांदेड गावात एका इसमाने कडुनिंबाच्या झाडाला दुपट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार, दिनांक २३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव मुन्ना उर्फ मुनेश्वर वंगण बघणारे वय (४७) रा. मांदेड असे असून, ते सेंटरिंगच्या कामावर जात असल्याची माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मुन्ना उर्फ मुनेश्वर हे मांदेड येथे एकटेच वास्तव्यास होते. सोमवारच्या पहाटे ते नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर मांदेड येथील शेती शिवारातील एका शेतात असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. ही बाब सकाळी उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कळविण्यात आले. मृतकाच्या पश्चात एक मुलगी व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा साप चावल्याने मृत्यू झाला होता. मुलगी लाखांदूर येथे विवाह करून सासरी राहत असून मुलगा बाहेरगावी कामावर असल्यामुळे मुन्ना उर्फ मुनेश्वर हे गावात एकटेच राहत होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.