देवणारा येथे वीज कोसळून २२ शेळ्यांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील मौजा देवणारा येथे सोमवारी (दि. २२ जून २०२६) सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या दरम्यान झालेल्या जोरदार पाऊस व विजांच्या कडकडाटात वीज कोसळून २२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रभावित पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील भारत भिका पंदाम यांच्या शेताजवळ पावसापासून बचाव करण्यासाठी शेळ्यांचा कळप एका ठिकाणी उभा होता. त्याचवेळी अचानक वीज कोसळल्याने शेळ्या तिच्या तडाख्यात सापडल्या.

या दुर्घटनेत २२ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत भारत भिका पंदाम – १४ शेळ्या, सौ. गौरी धनराज कोसरे-२ शेळ्या,ताराचंद श्रावण सलाम- ३ शेळ्या देबीचंद सीताराम मेश्राम-१ शेळी, कन्हैया सुदाम मरस कोल्हे – २ शेळ्या अशा प्रकारे एकूण २२ शेळ्यांचा मृत्यू झाला असून या घटनेत संबंधित पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात शेळीपालन हा अनेक कुटुंबांच्याउदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय असल्याने या दुर्घटनेचा फटका थेट त्यांच्या आर्थिक स्थितीवर बसला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी प्रशासनाला कळविले. महसूल विभाग व पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी प्रभावित पशुपालक व ग्रामस्थांनी केली आहे. अचानक घडलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे देवणारा गावात शोककळा पसरली असून पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *