
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या २०२५ च्या महासंग्रामात मतदारांनी प्रस्थापित राजकारणाचे सर्व कयास धुळीस मिळवत एक ऐतिहासिक कौल दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार सागर गभने यांनी ७,७५८ मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला आहे. आमदार राजू कारेमोरे यांनी पक्षादेश झुगारून दिलेल्या समर्थनामुळे या विजयाला ‘राजकीय बंडाचा विजय’ मानले जात असून, शहरात बदलाची लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिग्गजांना धक्का; ‘पॉवर सेंटर’ कोलमडले या निवडणुकीत प्रबळ राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना नाकारत सागर गभने यांच्यावर विश्वास दाखवला. या शर्यतीत बंडखोर अपक्ष आशिष कुकडे दुसºया क्रमांकावर, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कारेमोरे तिसºया, तर भाजपचे प्रदीप पडोळे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या सभांचा प्रभाव मतपेटीतून दिसून आला नाही.
नगरसेवक संख्याबळ: १०-१० चा ‘डेडलॉक’; काँग्रेस ठरणार निर्णायक नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणाही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप आणि राष्ट्रवादी (अपक्ष गट) प्रत्येकी १० जागांसह बरोबरीत आहेत. त्यामुळे सत्तेचे गणित आता काँग्रेसच्या ३ जागा, शिवसेना (शिंदे गट) आणि १ अपक्ष उमेदवाराच्या भूमिकेवर अवलंबून आहे.