
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : शहर विकासाचा कणा मानल्या जाणाºया मालमत्ता कर वसुलीमध्ये तुमसर नगर परिषदेने यंदा ‘ऐतिहासिक’ कामगिरी बजावली आहे. नगराध्यक्ष सागर मनोहर गभने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ कोटी १९ लाखांच्या एकूण मागणीपैकी ३ कोटी १ लाख रुपयांचा कर तिजोरीत जमा झाला असून, ७२.२७ टक्के वसुलीचा विक्रमी टप्पा गाठला आहे.विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील ज्या मोठ्या ‘मातब्बरांकडे’ लाखोंचा कर थकीत होता, त्यांनीही यंदा कर भरून प्रशासनाला सहकार्य केले आहे. या मोहिमेदरम्यान एकीकडे कर निरीक्षक कमलेश कुंभरे हे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून ‘मौन’ बाळगत असल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती देण्याबाबत कुंभरे यांची ही ‘पळकाढू’ भूमिका शहरात चर्चेचा विषय ठरली असतानाच, नगराध्यक्ष सागर गभने यांनी स्वत: आकडेवारी जाहीर करून पारदर्शकतेचा परिचय दिला. अखेर या प्रशासकीय ओढाताणीनंतर का होईना, पण वसुलीचा आकडा ऐतिहासिक ठरला आहे.