तुमसर शहरात नागरी समस्यांचा डोंगर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर शहरातील विविध प्रभागांमध्ये सध्या नागरी सुविधांचा मोठा अभाव दिसून येत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रखडलेली नाल्यांची स्वच्छता आणि अनियमित पाणीपुरवठा या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद मुख्याधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक नाल्यांची नियमित सफाई झालेली नाही. नाल्यांमध्ये कचरा साचल्याने सांडपाणी साचून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून शहरात मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक प्रभागांमध्ये पाणीपुरवठा अत्यंत अनियमित असून कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या मागण्यांकडे वेधले लक्ष:प्रत्येक प्रभागात तातडीने नाल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने करण्यात यावा. आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, नगरसेवक नितीन धांडे, माजी नगरसेवक राजू गायधने, युवासेना तालुका प्रमुख पवन खवास, सामाजिक कार्यकर्ते दीपक लूटे, हेमंत बांते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *