
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ विविध प्रबोधनात्मक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात दररोज वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे यांनी केले आहे. या वर्षीचा समता सप्ताह विशेष ठरणार असून भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त, तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा: ८ एप्रिल : समता सप्ताहाचा भव्य शुभारंभ, ९ एप्रिल : शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, मानवी हक्क व महाड सत्याग्रहावर व्याख्याने; तसेच संत गाडगे महाराज यांच्या कार्यावर वक्तृत्व, निबंध व लघुनाट्य स्पर्धा, १० एप्रिल : पथनाट्याद्वारे सामाजिक न्याय योजनांची जनजागृती व ह्लमार्जिन मनीह्व योजनेवर कार्यशाळा, ११ एप्रिल : महात्मा फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम, १२ एप्रिल : ‘संविधान जागर’ अंतर्गत संविधान निर्मिती, मूलभूत अधिकार व कर्तव्यांवर व्याख्याने; महिला मेळाव्यातून महिलांसाठी आंबेडकरांच्या कार्याची माहिती, १३ एप्रिल: ‘महाड चवदार तळे सत्याग्रह व मानवी हक्क’, ‘संत गाडगे महाराजांचे कार्य’, ‘महात्मा फुले यांचे सामाजिक योगदान’, या विषयांवर जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धा, (स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन), याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रबोधन शिबिर, विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान आणि जात पडताळणी कार्यालयामार्फत आॅनलाइन वैधता प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात येणार आहे. १४ एप्रिल : समारोप कार्यक्रम, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डॉ.आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असून शेतकºयांसाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण मेळावा व महाड सत्याग्रहावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल. समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव दृढ करण्यासाठी हा सप्ताह महत्त्वपूर्ण ठरणार असून, सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून या उपक्रमांना यशस्वी करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाद्वारे करण्यात आले आहे.