
भंडारा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील देवरी येथील आरटीओ चेक पोस्टवर अवैध वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी २८ फेब्रुवारी रोजी अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली व तत्काळ कारवाईची मागणी केली. स्थानिक ट्रकचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, चेक पोस्टवर नियमित कागदपत्रे असूनही ५०० ते १५०० रुपयांपर्यंत रोख रक्कम उघडपणे घेतली जात असल्याचा आरोप आहे. ही वसुली संगनमताने आणि पद्धतशीररीत्या सुरू असल्याचेही काही चालकांनी सांगितले.
या रकमेचा अधिकृत आदेश काय आहे व ती रक्कम नेमकी कुठे जमा होते, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रपरीषदेत खासदारांनी स्पष्ट केले की, अवैध वसुलीविरोधात आवाज उठवणाºया काही चालकांना दमदाटी केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, तसेच आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री व संबंधित विभागीय मंत्र्यांना निवेदन पाठवून उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची व दोषींना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवैध वसुली थांबत नसेल तर स्वत: ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही खासदारांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे वाहतूकदारांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.