महिला सुरक्षेबाबत असंवेदनशील वर्तनाचा आरोप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात घडलेल्या महिला विनयभंगाच्या गंभीर घटनेप्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कथित असंवेदनशील वर्तनाबाबत थेट महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पत्रपरीषदेत दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच भंडारा जिल्ह्यात महिला विनयभंगाची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती घेऊन तातडीची कारवाई व्हावी यासाठी खासदार डॉ. पडोळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, ‘मला कशाला फोन करता, डीजीला फोन लावा,’ असे कथितपणे उद्धट व पदाला न शोभणारे उत्तर मिळाल्याचा गंभीर आरोप खासदारांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

महिला अत्याचारासारख्या संवेदनशील प्रकरणात जिल्ह्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाºयांकडून अपेक्षित असलेली तत्परता, संवेदनशीलता व जबाबदारी दिसून आली नसल्याचे खासदारांनी नमूद केले आहे. खासदार पडोळे म्हणाले, ‘महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. मात्र, भंडारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित संवेदनशीलता दिसत नाही, ही चिंतेची बाब आहे. तसेच, जिल्ह्यात रेती तस्करी, गौहत्या, महिला अत्याचार, अवैध दारू विक्री व अमली पदार्थ तस्करीसारख्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचा आरोप करत योग्य नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे पोलीस दलाचे मनोबल खालावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच भंडारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ठोसउपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदारांनी केली आहे. महिला सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *