
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, सातपुडा पर्वतरांगातील आदिवासीबहुल लेंडेडझरी ते गायमुख या गावांना जोडणारा ६ किलोमीटरचा रस्ता अवघ्या चार महिन्यांतच खड्डेमय झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने मोठ्या निधीतून हा रस्ता बांधला असताना, इतक्या अल्प कालावधीतच रस्त्याची अवस्था बिकट होणे म्हणजे बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या मार्गावर जड वाहतुकीचा वापर नसल्याचे सांगितले जाते. तरीदेखील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह पादचाºयांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आदिवासीबहुल गावांना जोडणारे रस्ते पक्के व मजबूत असावेत, या उद्देशाने शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला गेला; प्रत्यक्षात मात्र हा निधी निकृष्ट कामात वाया गेला काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.