
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : तुमसर तालुक्यातील कुरमुडा येथे बिबट्याने केलेल्या बकरीच्या शिकार प्रकरणात वन विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा करून कर्तव्य बजावू नये तर त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी वन विभागाच्या अधिकाºयांकडे केली आहे. डोंगरी बुजरुक, कुरमुडा व पवनार खारी हा परिसर जंगल व्याप्त असून जंगली प्राण्यांचा शिरकाव आहे. कुरमुडा गावात काल मध्यरात्री बिबट्याने बकरीची शिकार करून दहशत पसरविली आहे. आज बकरी गेली उद्या माणूस जाईल असा जंगी टोला कुरमुडा वासीयांनी वनविभागाच्या अधिकाºयांवर लगावला आहे. कुरुमुडा गावात बिबट्याने चांगलीच दहशत पसरविली आहे.
बिबट्याने थेट कुरमुडा गावात घुसून बकरीचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या त्या मुक्या जनावराची धडपड पाहून ग्रामवासीयांच्या काळजाचा ठोका वाढला आहे. सदर घटना ही कुरमुडा येथील विष्णू बाबुराव गाते यांच्या गोठ्यात काल मध्य रात्रीच्या सुमारास घडली आहे. संपूर्ण गाव गाढ झोपेत असतांना दबा धरून असलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवून बकरीचा गळा चिरुन तिला जागीच ठार केले. आरडा ओरड झाल्याने गाते परिवार व ग्रामवासी जागे झाले परंतु बिबट्याच्या जबड्यातून बकरीला वाचवू शकले नाही हे येथे उल्लेखित आहे. बिबट्याची दहशत कायम असून वन विभागाच्या अधिकाºयांनी वनसंपदेच्या रक्षणाबरोबरच नागरिकांचा सुद्धा बचाव करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. काही दिवसापूर्वी चिखला व चुलरडोह येथे वाघाने हल्ला चढवून गाईची शिकार केली होती हे विशेष.