
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सायंकाळच्या सुमारास मालकी दुचाकीने काही कामकाजा निमित्त लाखांदूर गावात जात असताना चप्राड कडून दिघोरी कडे भरधाव वेगाने जाणाºया अज्ञात पिक अपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना १७ डिसेंबर रोजी राञी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील शिवाजी टी पॉईंट परीसरात घडली.
महादेव केशव मेश्राम (६२) रा लाखांदूर असे घटनेतील मृतक ईसमाचे नाव आहे. ते लाखांदूर येथील शिवाजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. सविस्तर असे की, घटनेतील मृतक महादेव मेश्राम सायंकाळच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथीलशिवाजी टी पॉइंट परिसरातून लाखांदूर गावात मालकी दुचाकी ने जात होते. दरम्यान चप्राड ते लाखांदूर मार्गे भरधाव वेगाने एक पिक अप वाहन चालक आपले वाहन घेऊन जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. पिकप च्या धडकेत दुचाकी वरील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिमेंट रस्त्यावर कोसळले यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली.
अपघातात झाल्याचे पाहून अपघात करणारा अज्ञात पिकप वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच त्यांनी जखमी अवस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव मेश्राम यांना उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या मृत्यूची माहिती परिसरात होताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालय स्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून अज्ञात पिकअप वाहन व चालकाचा शोध सुरू आहे..