
भंडारा पत्रिका /प्रतिनिधी पालांदूर : लाखनी तालुक्यातील किटाडी क्षेत्र सहायक कार्यालय अधीनस्त पालांदूर परिसरात मोठमोठ्या झाडांची सर्रास विनापरवाना तोंड करून भरदिवसा बिनबोभाट वाहतूक सुरूच आहे. या सर्व प्रकाराकडे वनविभाग दुर्लक्ष करित असल्याने या भागात दिवसेंदिवस वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ होत असून निसर्गरम्य हिरवेकंच शेतशिवार बोडके होण्याच्या मार्गावर आहे. पालांदूर परिसरात असलेल्या शेतशिवारातून स्थानिक कास्तकारांकडून कवडीमोल भावात झाडे खरेदी करायची व त्यांना विनापरवानाकटाई करून ठेकेदारांनी ठरविलेल्या जवळच्या ठिय्यावर विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे पोहोचवून जमा करायची व जमा केलेली अवैध लाकडे पुढे नागपूर सारख्या शहराच्या ठिकाणी मोठ्या ट्रकद्वारे रवाना करायची असा नित्यक्रम अहोरात्र पालांदूर येथील मुख्य बाजार चौकातून सुरू असतो, परंतु वनविभागाने मात्र याकडे जाणुनबुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष आणि कानाडोळा केला असल्याने हा गैरप्रकार दिवसेंदिवस फोफावत असल्याचे दिसून येत आहे. पालांदूर परिसरातील अनेक गावातील शिवारामधील मोहरलेला आंबा, किन, मोह, बाभूळ, कडूलिंब यासह अनेक जातीच्या मोठ्या व मौल्यवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. परिसरातून दररोज हजारो टन लाकडाची खुलेआम वाहतूक होतांना दिसून येत आहे.