भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर साकोलीच्या स्थानिक राजकारणात खरी रंगत निर्माण झाली असून आज, १६ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदाची व दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. सत्तासमीकरण, इच्छुकांची मोचेर्बांधणी, पक्षांतर्गत हालचाली आणि वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या गुप्त रणनीती यामुळे आजची सभा केवळ औपचारिक न राहता राजकीय थरा- राची ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्षा देवश्री मनीष कापगते यांच्यासह भाजपाचे आठ नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसचे सात नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आणि तीन अपक्ष असे प्रारंभीचे संख्याबळ होते.
मात्र अपक्ष नगरसेविका रोहिणी मुंगूलमारे व सपन शरद कापगते यांनी भाजपाला पाठिंबा देतपक्षात प्रवेश केला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नयन पटेल यांनी भाजपाला समर्थन दिल्याने भाजपाचे संख्याबळ थेट ११ वर पोहोचले आहे. या भक्कम संख्याबळामुळे उपाध्यक्ष पदावर भाजपाचाच शिक्का बसणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. भाजपाकडून उपाध्यक्ष पदासाठी रोहिणी मुंगूलमारे, राजू पोगडे आणि पंकज मुंगूलमारे ही तीन नावे चर्चेत असून यापैकी कोणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडणार, याबाबत कमालीचा सस्पेन्स कायम आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपाकडून आनीक निंबेकर, नितीन खेडीकर, अमोल हलमारे, रमेश मुंगूलमारे आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दुसरीकडे काँग्रेसकडून पत्रकार संतोष कोरे, अश्विन नशिने, अशोक कापगते ,हेमलता भेंडारकर, आनंद नंदागवळी, नासिर अली , तसेच एड. दिलीप कातोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत आपले पत्ते शेवटच्या क्षणापर्यंत बंद ठेवले असून कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचे, यावरून पक्षांतर्गत राजकारण तापले आहे. आजच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण होताच साकोलीच्या स्थानिक राजकारणाचे नवे चित्र स्पष्ट होणार असून, या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

तालुका पत्रकार संघाची स्वीकृत सदस्य पदासाठी ठाम मागणी
साकोली तालुका पत्रकार संघाचे सदस्य तथा पत्रकार संतोष कोरे यांनी काँग्रेस पक्षाकडून नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वीकृत सदस्यांमध्ये नेहमीच राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांनाच प्राधान्य दिले जाते; मात्र यावेळी पत्रकारितेचे प्रतिनिधित्व नगरपरिषदेत मिळावे, या मागणीसाठी साकोली तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येत ठाम व आग्रही भूमिका घेतली आहे. पत्रकार संघाच्या वतीने आमदार नाना पटोले यांच्याकडे मागणी करण्यात आली असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला नगरपरिषदेत प्रतिनिधित्व मिळावे आणि पत्रकार संतोष कोरे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करावी, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. याबाबत आमदार पटोले यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती असून, त्यामुळे पत्रकार वर्गासह नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली आहे.