
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पोलीस स्टेशन साकोली हद्दीत बैलांच्या शंकरपटादरम्यान चोरीस गेलेल्या मोटरसायकल प्रकरणाचा साकोली पोलिसांनी यशस्वी तपास करत मोठा पदार्फाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी करणकुमार भोजराज गिºहेपुंजे (वय अंदाजे ३०, रा. किन्ही/एकोडी, ता. साकोली, जि. भंडारा) याला तसेच दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी शंकरपटातून एकूण १३ मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्व १३ मोटरसायकली जप्त करण्यात यश मिळवले.
या उल्लेखनीय कारवाईमुळे साकोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या एकूण ६ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. तसेच पोलीस स्टेशन कारधा व लाखनी हद्दीतील शंकरपटातून चोरीस गेलेल्या आणखी २ मोटरसायकलीही हस्तगत करण्यात आल्या. यासोबतच जिल्ह्यातील एकूण ८ आणिगोंदिया जिल्ह्यातील ५ अशा एकूण १३ गुन्ह्यांचा साखळी उलगडा करण्यात साकोली पोलिसांना यश आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापुरे व ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुले, हवालदार अनिफ राऊत तसेच नरेंद्र झलके, धनविजय गणवीर, राहुल गायधने, सचिन राऊत, मंगेश ब्राम्हणकर, टेकचंद बुरडे, गौतम थुलकर व महेश नैताम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.