
भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू निर्मिती व साठवणुकीविरोधात विशेष मोहीम राबवित पोलिसांनी विविध ठिकाणी धाडसत्र सुरू ठेवले आहे. २० जून रोजी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून सडवा मोहाफुल रसायन आणि हातभट्टी दारूसह एकूण सुमारे १ लाख ८७ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाकाडोंगरी येथे ४० हजारांचा मोहाफास जप्त
पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गिते यांच्या फिर्यादीवरून गोपीचंद ठन्नु करकाडे (वय ५०, रा. नाकाडोंगरी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नाकाडोंगरी शेतशिवारातील नाल्याजवळील ठिकाणी छापा टाकला असता २०० किलो सडवा मोहाफास, अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुरमुडा येथे २५ लिटर हातभट्टी दारू जप्त
दुसºया कारवाईत धर्मदास बेनिराम गोळंगे (वय ३९, रा. कुरमुडा) याच्या ताब्यातून २५ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. या दारूची अंदाजे किंमत ५ हजार रुपये असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारली जंगल परिसरात ५५० किलो सडवा मोहाफास जप्त
मौजा कारली परिसरात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून उमेश देवाजी गजाम (वय ३६, रा. कारली) याच्या ताब्यातून ५५० किलो सडवा मोहाफुल रसायन जप्त केले.
जप्त मालाची अंदाजे किंमत १ लाख १० हजार रुपये असून आरोपीविरुद्ध कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सितासावंगी येथे ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
तसेच सितासावंगी जंगल शिवा- रात करण्यात आलेल्या कारवाईत आशिष दामाजी मारबते (वय ३६, रा. सितासावंगी) याच्या ताब्यातून १६० किलो सडवा मोहाफास जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ३२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोबरवाही पोलिसांनी अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू केलेल्या मोहिमेमुळे परिसरातील अवैध धंदे करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित तपासी पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार गणेश बांते आणि सुमित राहांगडाले हे करीत असून अवैध दारू व्यवसायाविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.