नेते येताच रस्ते गुळगुळीत, नागरिकांसाठी मात्र गिट्टीचा सापळा!

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरात गटर पाईपलाईन व नळ पाईपलाईन योजनेअंतर्गत अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही कामे आवश्यक असली, तरी काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्ते पूर्ववत करण्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या शहरभर दिसून येत आहे.

खोदकाम केलेले खड्डे योग्य पद्धतीने बुजविण्याऐवजी त्यावर केवळ मुरूम, गिट्टी किंवा खडी टाकून काम आटोपल्याचे दाखवण्यात आले असून, हीच गिट्टी आणि उखडलेले रस्ते आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागले आहेत. भंडारा शहरातील चांदणी चौक, राजीव गांधी चौक, तकीया वॉर्ड, मुस्लिम लायब्ररी चौक तसेच इतर अनेक छोटे-मोठे रस्ते आणि चौकांमध्ये अशाच प्रकारे उघडी गिट्टी, अर्धवट बुजवलेले खड्डे, उखडलेले डांबरी थर आणि धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. मुख्य रस्त्यांपासून ते गल्लीबोळांपर्यंत अनेक भागांत वाहनचालकांना अक्षरश: कसरत करत प्रवास करावा लागत आहे.

गिट्टीमुळे वाहनांचे टायर फुटताहेत, अपघातांचाही धोका वाढला

रस्त्यांवर टाकण्यात आलेली सैल गिट्टी नागरिकांसाठी मोठा धोका ठरत आहे. दुचाकी, सायकल तसेच खाजगी चारचाकी वाहनांच्या टायरमध्ये ही गिट्टी घुसून टायर फुटण्याच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. काही ठिकाणी वाहनाखाली आलेली गिट्टी भरधाव वेगाने उडून मागून येणाºया नागरिकांच्या अंगावर, डोळ्यांवर किंवा चेहºयावर आदळत असल्याने दुखापतींचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. रस्त्यांवरील सैल खडीमुळे वाहनांचे संतुलन बिघडून घसरण्याच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि रुग्णवाहिका यांनाही या रस्त्यांचा मोठा फटका बसत आहे.

पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती

सध्या उन्हाळ्यातच रस्त्यांची ही अवस्था नागरिकांना त्रासदायक ठरत असताना, येत्या पावसाळ्यात हीच परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या रस्त्यांवर टाकलेली गिट्टी पावसाच्या पाण्याबरोबर बाजूला वाहून जाईल आणि आतल्या खड्डयांचे मूळ स्वरूप पुन्हा समोर येईल. त्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार होऊन अपघातांची शक्यता अधिक वाढणार आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यास खड्डे दिसणारही नाहीत, अशा वेळी गंभीर अपघात घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

‘निधी नाही’ हा बहाणा की नियोजनशून्यता?

शहरातील नागरिकांमध्ये आणखी एक प्रश्न चर्चिला जात आहे—बाहेरून मोठे नेतेशहरात आले, कार्यक्रम झाले, स्वागताच्या तयारीसाठी निधी उपलब्ध होतो; मग शहरातील जीवघेण्या रस्त्यांसाठी निधी का उपलब्ध होत नाही? रस्ते दुरुस्तीच्या कामात विलंब होण्यामागे निधीअभावी अडचण आहे की प्रशासनाची उदासीनता, याबाबतही शंका उपस्थित होत आहे.

अपघात होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का?

भंडारा शहरातील सध्याची रस्त्यांची अवस्था पाहता, ही केवळ गैरसोय नसूनसार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. उखडलेले रस्ते, सैल गिट्टी, धुळीचे लोट, असमतल पृष्ठभाग आणि खड्डयांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर येत्या पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, अपघात टाळण्यासाठी आधीच ठोस पावले उचला’ अशी एकमुखी मागणी आता भंडारा शहरातून पुढे येत आहे.

 

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *