टिप्परला अपघात, दोघांचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर :- लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भीषण टिप्पर अपघातात दुदैवी मृत्यू झाला. या अपघातात चालकासह क्लिनरलाही जीव गमवावा लागला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, सुरेश आनंदराव भुरले वय (३६,) रा. मांढळ ता. लाखांदूर जि. भंडारा. हे टिप्पर चालक म्हणून कार्यरत होते. सध्या ते ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास होते. गुरुवारी (दि. ११ जून) पहाटे उमरेड येथून गिट्टी भरून ते गडचिरोली जिल्ह्यातील गेगाव (ता. आरमोरी) येथे जात होते. त्यांच्यासोबत क्लिनर विश्वनाथ देवराम कुंभरे (रा. ईरव्हा, काम्पाटेम्पा, जि. चंद्रपूर) होता. ब्रम्हपुरी-आरमोरी मुख्य मार्गावरील पारडगाव फाट्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर निलगिरी बारसमोर हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अशोक लेलँड कंपनीच्या एमएच-४० सीडी-९००२ क्रमांकाच्या टिप्परमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

परिणामी टिप्पर रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यात जाऊन कोसळला. नाल्यात पडताना टिप्परमधील गिट्टीचा संपूर्ण भार पुढील कॅबिनवर आल्याने कॅबिनचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आणि चालक सुरेश भुरले व क्लिनर विश्वनाथ कुंभरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जेसीबीच्या सहाय्याने दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत. दरम्यान, शवविच्छेदनानंतर सुरेश भुरले यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मांढळ येथे आणण्यात आले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील आणि भाऊ असा मोठा परिवार आहे.या दुदैर्वी घटनेमुळे मांढळ गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *