
भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा बघेडा : आसलपाणी जंगलात असलेल्या घाटमारा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला एका ६० ते ६५ वर्ष वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी तातडीने धाव घेतली. प्राथमिक पाहणीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षांच्या दरम्यान आहे. मृतदेहाच्या शरीरावर कोणत्याही उघड जखमा दिसून आल्या नाहीत, मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मतीमंद असल्याचे सांगितले जात आहे आणि ही महिला आठवड्यापासून गर्रा बघेडा आसलपाणी परिसरात भटकंती करताना दिसत असायची आणि ही महिला घाटमारा परिसरात वन विभागाच्या अधिकाºयांना दोन दिवसापासुन भटकंती करताना दिसत होती. त्यांनी पाणी पण पाजले हा प्रकार नेमका घातपाताचा आहे की, अन्य काही कारणाने मृत्यू झाला, याचा शोध पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश बांते आणि तुषार कांबळे हे करीत आहेत. या वेळी उपस्थित वन परिक्षेत्र अधिकारी जे.एस.बेले, वनरक्षक दिपक उईके, वनरक्षक तोताराम ब्राह्मणकर, वन रक्षक मेश्राम आणि देवणारा चे पोलिस पाटील, आसलपाणी चे पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.