रेल्वेतील मोबाईल चोरी प्रकरणातील आरोपी अटक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : इतवारी-टाटानगर एक्सप्रेस (गाडी क्र. १८११०) मध्ये प्रवाशाचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपीस पुढील कारवाईसाठी शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) गोंदिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ मार्च २०२६ रोजी घडलेल्या या चोरीप्रकरणी जीआरपी गोंदिया येथे अपराध क्र. ३९/२०२६, कलम ३०५ (सी) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान गुप्तमाहितीच्या आधारे दि. १३ एप्रिल २०२६ रोजी कारवाई करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे मंडल सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली, भंडारा रोड पोस्टच्या प्रभारी एलिजाबेथ पवार यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठित करण्यात आले. या पथकात प्रधान आरक्षक ईशांत दीक्षित, सहाय्यक उपनिरीक्षक जे. के. सिंह, प्रधान आरक्षक रामफल कुरैती, आरक्षक राजू पेसने व पंकज भंडारकर यांचा समावेश होता. पथकाने भंडारा शहरातील कस्तूरबा गांधी वॉर्ड परिसरात स्थानिक पोलीस ठाण्याला कळवून छापा टाकला. यावेळी साहिल उर्फ गणेश लांजेवार (वय १८ वर्षे, रा. कस्तूरबा गांधी वॉर्ड, भंडारा) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सदर चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे २८,९९९ रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा ग्रे रंगाचा मोबाईल जप्त करण्यात आला. यानंतर आरोपीस आवश्यक कागदपत्रांसह जीआरपी गोंदिया यांच्याकडे पुढील तपास व कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *