
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी /मोठी : माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देता, अर्जदाराला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, दिघोरी/ मोठी येथे उघडकीस आला आहे. जन माहिती अधिकारी आणि संबंधित कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराविरोधात त्रस्त झालेले अर्जदार राजू गणेश वलथरे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारदार राजू वलथरे यांनी दिघोरी/मोठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे जन माहिती अधिकारी पुरुषोत्तम महादेव भलावी यांच्याकडे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिती अधिकारांतर्गत पहिला अर्ज केला होता.
मुदतीत माहिती न मिळाल्याने त्यांनी २३ मार्च २०२६ रोजी प्रथम अपिलीय अधिकाºयांकडे अपील दाखल केले. यानंतर जन माहिती अधिकाºयांनी २४ मार्च २०२६ रोजी अर्जदाराला पत्र पाठवून २७ मार्च रोजी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून माहिती घेऊन जाण्यास सांगितले. परंतु, अर्जदार सर्व कामकाज सोडून दिलेल्या तारखेला कार्यालयात उपस्थित झाले असता, जन माहिती अधिकारी स्वत: कर्तव्यावरून गैरहजर राहिले. परिणामी अर्जदाराला रिकाम्या हाताने परतावे लागले. हा प्रकार जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक करण्यात आल्याचा आरोप वलथरे यांनी केला आहे. परिचर राजू वलथरे यांना शासकीय निवासस्थान मंजूर करण्यात आले होते. सन २०२३ पासून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची घरभाडे वसुली करण्यात आली नव्हती. मात्र, नोव्हेंबर २०२५ पासून अचानक कोणताही प्रशासकीय आदेश नसताना त्यांच्याकडून घरभाडे वसुली सुरू करण्यात आली, तसेच ही वसुली २४ हप्त्यांमध्ये करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
या बेकायदेशीर कारवाईमुळे व्यथित होऊन वलथरे यांनी घरभाडे वसुलीच्या प्रशासकीय आदेशाची प्रत माहिती अधिकारात मागितली होती. मात्र, असा कोणताही आदेश अस्तित्वात नसल्यानेच माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक भागवत मदनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मदनकर यांनी यापूर्वी देखील वैद्यकीय अधिकारी यांच्या खोट्या सह्या करून प्रशासकीय कामकाज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याबाबत त्यांना खुलासा सादर करण्याचे पत्रही वैद्यकीय अधिकारी यांनी दिले होते. अशा अनेक तक्रारी असूनही वरिष्ठ पातळीवरून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मदनकर यांचे मनसुबे वाढले असून, ते वैयक्तिक आकस ठेवून इतरांना हेतूपुरस्सर त्रास देण्यासाठी बेकायदेशीर कृत्ये करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. “प्रशासकीय आदेश नसताना सुरू केलेली घरभाडे वसुली तात्काळ थांबवून संबंधित आदेशाची प्रत मला देण्यात यावी. तसेच माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणारे आणि पदाचा गैरवापर करून त्रास देणारे कर्मचारी मदनकर व जन माहिती अधिकारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी,” अशी मागणी अर्जदार राजू वलथरे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आता यावर जिल्हा परिषद प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.