
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत लॉर्ड्स पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भंडारा येथील विद्यार्थिनी अक्षरा अंबोने हिने ज्युनियर अॅस्ट्रॉनॉमी टीम इंडिया २०२६ मध्ये स्थान मिळविले आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. देशभरातून निवड झालेल्या अवघ्या पाच विद्यार्थ्यांमध्ये अक्षराचा समावेश झाला आहे. भारतीय राष्ट्रीय ज्युनियर अॅस्ट्रॉनॉमी आॅलिम्पियाड आणि विविध स्तरांवरील कठोर निवड प्रक्रियेत यश संपादन करून तिने हे मानाचे स्थान प्राप्त केले. अक्षरा १ ते ८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान थायलंड येथे आयोजित करण्यात येणाºया इंटरनॅशनल आॅलिम्पियाड आॅन अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स फॉर ज्युनियर्स २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेत जगभरातील गुणवंत विद्यार्थी सहभागी होतात. लॉर्ड्स पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि एलपीएस परिवाराने अक्षराचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षराच्या या यशामुळे भंडारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून भविष्यातही ती देश, राज्य आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.