लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाची हत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया :गोरेगाव तालुक्यातील बाघोली येथील लाख खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे बाबुलाल दुलीचंद पटले (वय ५७) यांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कवलेवाडा शिवारातील दत्त मंदिराजवळील झाडीमध्ये त्यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीती आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे. शांत आणि निसर्गरम्य मानल्या जाणाºया या भागात घडलेल्या या घटनेने बाघोली आणि कवलेवाडा परिसर हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबुलाल पटले हे अनेक वर्षांपासून गावोगावी फिरून लाख खरेदी करण्याचा व्यवसाय करत होते. शुक्रवारी, ५ जून रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे व्यवसायाच्या निमित्ताने सटवा आणि कवलेवाडा परिसरात गेले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या शोधासाठी धावपळ सुरू केली.

शोधादरम्यान त्यांची दुचाकी कवलेवाडा शिवारातील दत्त मंदिराजवळ बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता अधिक वाढली.रात्री उशिरापर्यंत नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचितांनी परिसरात शोधमोहीम राबवली. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास दत्त मंदिरालगतच्या झाडीझुडपात बाबुलाल पटले यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. हे दृश्य पाहताच उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. घटनेची माहिती तत्काळ गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, सर्वसामान्य आणि मनमिळावू स्वभावामुळे बाबुलाल पटले यांची परिसरात चांगली ओळख होती. त्यांच्या अकाली आणि दुदैर्वी मृत्यूमुळे बाघोलीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध सुरू आहे. या हत्येचे गूढ उकलण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *