सामाजिक वनीकरण विभागाची २,४०० झाडे जळून खाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : वृक्षलागवड व संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना समाजकंटकांकडून पर्यावरणाची हानी करणाºया घटना समोर येत आहेत. गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील स्मशानभूमीत रविवारी २१ जून रोजी अशीच एक धक्कादायक घटना घडली असून सामाजिक वनीकरण विभागातर्फे मागील तीन वर्षांपासून संवर्धन केल्या जात असलेल्या नर्सरीलाच काहींनी आग लावल्याचे उघडकीस आले आहे. याघटनेमुळे तीन वर्षांच्या परिश्रमातून फुलवलेली हिरवळ काही मिनिटांतच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पिंडकेपार ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील स्मशानभूमी परिसरात २०२३-२४ यावर्षी पासून वृक्षारोपण करून त्याचे संवर्धनाचे केले जात होते. तीन वर्षांच्या प्रयत्नांमुळे ओसाड जागेचे हिरवळीमध्ये रूपांतर झाले होते.

यात विशेषत: वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, कडुलिंब यासारख्या विविध देशी प्रजातींची सुमारे १,४०० रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी अनेक झाडे सद्यास्थितीत सहा ते सात फूट उंच वाढली होती. मात्र, अज्ञात समाजकंटकांनी या परिसराला आग लावल्याने शेकडो झाडे जळून नष्ट झाली. घटनेची माहिती सामाजिक वनीकरण विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आली असून या घटनेचा निषेध करत पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांनी आग लावणाºया समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच वृक्षसंवर्धनासाठी खर्च करण्यात आलेला निधी दोषींंकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, सामाजिक वनीकरण विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

१३.५७ लाखांचा खर्च पाण्यात

पिंडकेपार येथील ग्राम रोजगार सेवकाने दिलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमी परिसरात सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुमारे १,४०० रोपे लावण्यात आली होती. दरम्यान, वृक्षलागवड व संवर्धनाचे काम मनरेगा अंतर्गत करण्यात येत होते. त्यात या कामासाठी गेल्या तीन वर्षात मजुरीपोटी १३ लाख ५७ हजार ४४१ रुपये खर्च करण्यात आले आहे. मात्र, तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर तयार झालेली हिरवळ आगीत नष्ट झाल्याने शासनाच्या निधीचेही मोठे नुकसान झाले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *