जुन्या वादातून वृद्धाची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जुन्या वादातून एका ६० वर्षीय वृद्धाला तीन ते चार जणांनी घरातून बाहेर सिमेंट रस्त्यावर फरकटत आणून बेदम मारहाण केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील डब्बेटोला येथे रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद करून तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, तिन्ही आरोपींना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. मुन्नीलाल वारलू कटरे (६०) रा. डब्बेटोला असे मृताचे तर रवि लक्ष्मण मेश्राम (३१) संजय लालाजी मेश्राम (३८) व अक्षय हेतराम मेश्राम (२५) अशी तिन्ही आरोपींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत मुन्नीलाल यांची गावातच चहा टपरी असून त्यांच्या शेजारी राहणारे आरोपी रवि व त्याची पत्नी मनिषा यांच्याशी त्यांचा जुना वाद होता. यात यापूर्वी त्यांचे अनेकदा शाब्दिक भांडणही झाले.

दरम्यान, घटनेच्या दिवशी रविवारी सकाळच्या सुमारास मृत मुन्नीलाल व मनिषा मेश्राम यांच्यात भांडण झाले. यावेळी मुन्नीलाल गावातीलच आपल्या बहिणीच्या घराकडे निघून गेले. मात्र, काही वेळांनी आरोपी रवि व त्याची पत्नी मनिषा त्याचबरोबर आरोपी संजय व अक्षय या चौघांनी त्या ठिकाणी येऊन मुन्नीलालला शिवीगाळ करून घराबाहेर बोलावले. मात्र, ते बाहेर न आल्याने सर्व आरोपींनी त्यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण करीत घराबाहेर सिमेंट रस्त्यावर ओढत आणले. यावेळी मुन्नीलाल यांची बहिण व वृद्ध आई मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता त्यांनाही थापडबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, चौघांनी शेजारील बैलगाडीची लाकडी पाटी काढून मुन्नीलालच्या पोट, छाती व कमरेवर वार करून बेदम मारहाण केली व घटनास्थळावरून पोबारा केला.

दरम्यान, मुन्नीलालचे कुटूंबीय व काही गावकºयांनी गंभीर जखमी मुन्नीलाल यांना गावातीलच डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मुन्नीलाल यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती गंगाझरी पोलिसांना देण्यात आली. गंगाझरीचे ठाणेदार वर्मा यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. याप्रकरणी मृताच्या बहिणीच्या तक्रारवरून गंगाझरी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून रविवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी रवि मेश्राम, संजय मेश्राम व अक्षय मेश्राम या तिघांना अटक केली. तिघांना सोमवारी १५ जून रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणात मनिषा मेश्राम हिचेविरुद्ध घटनास्थळावरून योग्य साक्ष न मिळाल्याने अटक करण्यात आली नसल्याचे गंगाझरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्मा यांनी सांगितले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *