रामपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वगार ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : तुमसर तालुक्यातील रामपूर येथे वन्यप्राणी बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील एक वगार ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली असावी, अशी प्राथमिक माहिती असून सोमवारी (दि. १५ जून २०२६) पहाटे सुमारे ५ वाजता ग्रामस्थांना याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, रामपूर येथील श्री. कुवरलाल सुरजलाल लील्हारे, जयलाल सुरजलाल लील्हारे व शोभेलाल सुरजलाल लील्हारे यांच्या मालकीची वगार गोठ्यात बांधलेली असताना बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. सकाळी गोठ्यातील जनावर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक कु. आर. आर. ईश्वरकर यांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधितांना शासकीय नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *