
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अर्जुनी येथील माजी उपसरपंच महेंद्र बागडे सकाळी मॉर्निंग वॉक करून घरी जात असता त्यांना अज्ञात मोटार सायकल स्वाराने धडक दिल्याने जबर जखमी झाल्याने उपचारा करता नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दवनीवाडा पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी मृतकाचे नातेवाईकांनी ही हत्या असल्याचा आरोप करीत आरोपी सापडे पर्यंत अंतिम संस्कार करणार नाही अशी भूमिका घेतल्याने दवनीवाडा पोलीस अपघात व हत्येच्या दृष्टिकोनातून तपास करीत आहे.
अर्जुनी येथील माजी उपसरपंच महेंद्र मोतीलाल बागडे ५९ वर्ष हे नेहमीप्रमाणे आज दिनांक १८ डिसेंबर रोजी पहाटे मॉर्निंग वाक करून आपले घरी पाणी टंकिजवळुन जात असताना सकाळी सहा वाजता चे दरम्यान अज्ञात दुचाकी चालकाने धडक देऊन गंभीर जखमी केल्याने त्यांना त्वरित तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरता आणले असता डॉक्टरांनी ते गंभीर जखमी असल्याने गोंदिया येथे नेण्याचा सल्ला दिला.त्यांना गोंदिया येथे नेले असता गोंदिया येथीलडॉक्टरांनी तपासून ते मृत्यू झाल्याचे सांगितल्यावर त्यांचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे आणून शवविच्छेदन करून नातेवाईकांचे स्वाधीन केले .
मात्र त्यांचे नातेवाईकांनी हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप करुन आरोपी मिळाल्याशिवाय अंतिम संस्कार करणार नाही अशी भूमिका घेतल्याने दवनीवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात अपघाताचा गुन्हा नोंद केला. हत्येच्या दृष्टिकोनातून तपासा करता पोलीस निरीक्षक वैशाली ढाले यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कुमार टेकाम यांचे नेतृत्वात तीन पथके तयार करण्यात आली असून घटनेचा तपास उप पोलीस निरीक्षक महेश राठोड करीत आहेत.