
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली नगर परिषदेच्या निकालाची तारीख जवळ येताच संपूर्ण शहरात एकच प्रश्न घुमू लागला आहे— ‘नगराध्यक्ष कोण होणार?’ चार वर्षांनंतर २ डिसेंबरला झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांसाठी १०७ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. २२ हजार ६८१ मतदारांपैकी १६ हजार १५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहिली. मात्र, निकालापूर्वीच शहरात चर्चेची आणि शर्यतीची बाजारपेठ तापली असून, विविध चिन्हांवर ‘भाव’ लावले जात आहेत. निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय वातावरण कमालीचे ढवळून निघाले.
पक्षांतर्गत नाराजी, तिकीट नाकारल्याने झालेली बंडखोरी, उमेदवारांचे बदलते गट आणि आट्यापाट्याचा खेळ यामुळे लढत बहुरंगी बनली. लाखो रुपयांची उधळपट्टी, मानअपमान, आश्वासनांची सरबराई आणि विविध डावपेचांचा वापर करत निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच आयुधे वापरण्यात आली. ‘पैसे घ्या, मतदान द्या’ असा चिंताजनक नवा अध्याय या निवडणुकीत उघड झाल्याने लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निकालापूर्वीच शहरात सुरू झालेला शर्यतीचा बाजार अधिकच गरम झाला आहे.
अनेकांनी केवळ नगराध्यक्ष पदावरच नव्हे तर नगरसेवक पदांच्या निकालांवरही डाव लावल्याची चर्चा आहे. प्रभागनिहाय मतांची आकडेमोड, जातीय व पक्षीय समीकरणे, बंडखोर उमेदवारांची भूमिका आणि संभाव्य क्रॉस व्होटिंग यामुळे अंकगणित अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. प्रत्येक गल्ली-बोळात, चहाच्या टपºयांवर आणि चौकाचौकात निकालाचे तर्कवितर्क रंगले आहेत. आता २१ डिसेंबर रोजी ईव्हीएममध्ये बंद झालेल्या उमेदवारांच्या भाग्याचे कुलूप उघडणार आहे. त्या दिवशी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार आणि कुणाला पराभवाची चव चाखावी लागणार, याचा फैसला होईल. मात्र तोपर्यंत उमेदवारांची धकधक वाढलेलीच असून, साकोली शहर सध्या निकालपूर्व उत्सुकता, तणाव आणि राजकीय चर्चेच्या भोवºयात अडकले आहे.