
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली, शेंदूरवाफा नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणसंग्रामात यावेळी मतदारांनी नवयुकांवर विश्वास दाखवला. अत्यंत चुरशीच्या या लढाईत अनेक दिग्गज पराभूत देखील झाले तर नवखे उमेदवार देखील निवडून आले. राजकारणाची कुठली पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्य, प्रभागातील नागरिकांची साथ, मित्रपरिवारची अहोरात्र मेहनतीच्या जोरावर या नवख्या उमेदवारांनी प्रस्थापितांना धूळ चारले. तिन्ही नगरसेवकांचा भंडाºयात देखील बराच मित्रपरिवार आहे. या निवडणुकीत मित्र परिवार यांची मोलाची साथ लाभल्याने आपल्याला नगरसेवक होता आले, असे निवडून आल्यानंतर नगरसेवकांनी म्हटले.
प्रभाग क्रमांक ०१ मधून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले इंजिनिअर पुष्कर ग्यानिवंत करंजेकर हे १५४ च्या मताधिक्याने निवडून आले. युवकांमध्ये असलेला त्यांचा दांडगा परिचय, प्रभागात खेचून आणलेली विकासाचे कामे, गरजूंना योग्य वेळी मदत करणे, त्यांच्या गरजेवेळी धावून जाणे व सोबतच बराच मोठा मित्र परिवार असल्याने या गोष्टी साध्य झाल्याने ते सहज निवडून आलं. यांच्या विजयाच्या रूपाने साकोलीत शिवसेनेने आपले खाते उघडले. प्रभागातील मागील पंचवार्षिक मध्ये निवडून आलेल्या रविभाऊ परशुरामकर यांचा त्यांनी पराभव केला. नागरिकांसाठी योग्य रस्ते, विद्यार्थी वर्गासाठी वाचनालये, पाण्याची सोय, आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे हेच आपले कर्तव्य असल्याचे मत नगरसेवक इंजी. पुष्कर करंजेकर यांनी बोलून दाखवले. प्रभाग क्रमांक ०३ मधून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलेले कुणाल भीमराव राऊत हे ९५ मतांनी विजयी झाले. काँग्रेस पक्षानी त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या धनवंता राऊत यांचे पती ईश्वरदत्ता राऊत यांचा पराभव केला.
प्रत्येक घरोघरी जाऊन घेतलेल्या भेटी, मागील वर्षात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास दाखवली तत्परता हे मतदार राजे विसरू शकले नाही. प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग घेणे, सोबतच युवा असल्याने युवा वर्गात देखील यांची मोठी ओळख आहे. सोबतच त्यांना प्रशासकीय कामांचा सुद्धा अनुभव आहे. प्रभागातील महिलावर्ग, कष्टकरी वर्ग युवा वर्ग यांनी सुद्धा यांच्यासाठी परिश्रम घेतले. सामान्य कुटुंबातील व्यक्ती सुद्धा नगरसेवक होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले. अवघ्या साकोली शहराचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्रमांक ०९ मधून सोनू उर्फ विवेक बैरागी हे ४७० च्या मताधिक्याने एकतर्फी विजय झाले.
काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले यांचे एकेकाळीचे निकटवर्तीय असलेल्या सोनू बैरागी यांनी अपक्ष निवडणूक लढवीत दणदणीत विजय प्राप्त केला. अल्पसंख्यांक समाजातील अगदी सामान्य कुटुंबातील असलेल्या या युवकाची क्रेज हे प्रत्यक्षदर्शिनी मतमोजणीच्या स्थळी याची देही याच्या डोळा अनुभवला. काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मित्रपरिवार व प्रभागातील नागरिक यांचे आग्रहखातिर सोनू बैरागी यांनी अपक्ष फॉर्म भरला. सोनू हे नेहमी गोरगरिबांच्या सोबतीला असतात. त्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देणे, कुठली शासकीय योजने बाबत मार्गदर्शन करणे, मदतीला धावून जाणे, प्रभागातील समस्या सोडविणेसाठी ते नेहमी प्रयत्नात असतात. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, प्रभागातील नागरिकांसाठी योग्य सुविधे बरोबर त्यांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत नगरसेवक सोनू (विवेक) बैरागी यांनी व्यक्त केले.