राष्ट्रीय महामार्गाच्या कुशीत मातृत्व! अस्वलीने दिला पिल्याला जन्म

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील सराटी-मोहघाटा जंगल परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील ब्रिजच्या खाली एका अस्वलीने सुमारे एक ते दीड महिन्यांपूर्वी अस्वलीने पिल्याला जन्म दिल्याची घटना उघडकीस आली आहे. एफडीसीएमच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या भागात वनविभागाने तात्काळ उपाययोजना करत अस्वल व पिल्याच्या सुरक्षेसाठी कठडे उभारले असून रात्रंदिवस कडक पहारा ठेवण्यात आला आहे. मानव आणि वन्यप्राण्यांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये, यासाठी परिसरात जनजागृतीही करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील सराठी जंगल परिसरात असलेल्या ब्रिजखाली गावाकडे जाणाºया नालीत अस्वलीने सुरक्षित व नैसर्गिक अधिवास निवडून पिल्याला जन्म दिला आहे. ही बाब या क्षेत्रात नियमित गस्त घालणाºया वन कर्मचाºयांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वाघ, बिबट, रानकुत्रे, लांडगे अशा इतर वन्यप्राण्यांपासून पिल्याला धोका निर्माण होऊ नये, तसेच अस्वल आक्रमक होऊ नये, या दृष्टीने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या. सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखनीचे वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय यांनी घटनास्थळी कठडे उभारून अस्वल व तिच्या पिल्याच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. सध्या अस्वल दिवसभर पिलाजवळच ठाण मांडून बसलेली असून रात्री अन्नाच्या शोधात जंगलात जाते. ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळेल अशाच ठिकाणी पिलाचा जन्म झाल्याने हा अधिवास पूर्णत: नैसर्गिक आणि सुरक्षित असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सराठी, मोहघाटा, जांभळी व आसपासच्या गावांमध्ये तसेच शाळांमध्ये जाऊन वनविभागाने जनजागृती केली आहे. विद्यार्थी, लहान मुले व ग्रामस्थांनी अस्वल व पिल्याच्या जवळ जाणे टाळावे, कोणताही संपर्क होऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वनविभागाच्या मते, पुढील १० ते १५ दिवसांत अस्वल आपले पिलू घेऊन जंगलात निघून जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, सराटी-मोहघाटा जंगलातून जाणाºया मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सुमारे ३ किमी लांबीचा उड्डाणपूल (ब्रिज) बांधण्यात आल्याने वाहतूक पूर्णत: वरून होते. त्यामुळे ब्रिजखालील परिसर सुनसान व शांत राहतो, जो वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग ठरला आहे. यामुळे येथे नेहमीच विविध वन्यप्राणी दिसून येतात. एफडीसीएम व वनविभागाचे कर्मचारी अहोरात्र गस्त घालत असून, जनतेच्या सहकार्याने अस्वल व तिच्या पिल्याची सुरक्षितता सुनिश्चित केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *