
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलत पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे यांच्या आदेशावरून भरारी पथकाने मोहाडी तहसीलमधील देव्हाडा खुर्द येथील रेल्वे पुलाखाली लपवून ठेवलेले चार टिप्पर जप्त केले. माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ४ वाजता अचानक गस्त मोहीम राबविण्यात आली. तहसील मोहाडी व तहसील तुमसर येथील अधिकारी-कर्मचाºयांना तत्काळ गस्तीचे आदेश देण्यात आले होते. गस्तीदरम्यान देव्हाडा खुर्द परिसरातील रेल्वे पुलाखाली विनापरवाना रेतीची वाहतूक करणारे ट्रक क्रमांक एमएच ३६ एफ ३४३०,एमएच ४९ बीझेड ५६०२, एमएच ४९ बीझेड ८७०२ व एमएच ४० डीसी ५२९५ आढळून आले. सदर वाहने तात्काळ जप्त करून पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय मोहाडी येथे आणण्यात आली.
या कारवाईत अंदाजे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही कारवाई तुमसरचे नायब तहसीलदार अप्पासाहेब वनखेडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मंडल अधिकारी विलास धावडे, ग्रामविकास अधिकारी आशिष कुकडे, आयुष गणवीर, गजानन उपराडे तसेच मोहाडीच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील ग्राम महसूल अधिकारी कार्तिक शिरस्कर, विकास कदम, महसूल सेवक चंद्रकुमार नंदनवार यांनी तुमसर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. अचानक झालेल्या या धडक का- रवाईमुळे वाळू माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाची भूमिका अधिक कठोर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.